दोन वर्षांपासून बेपत्ता महिलेला कुर्ला रेल्वे पोलिसांनी शोधून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दोन वर्षांपूर्वी बेपता झालेल्या महिलेला अखेर पुर्ला रेल्वे पोलिसांनी शोधून काढले. तिला शोधण्यासाठी कुर्ला रेल्वे पोलीस उत्तर प्रदेशला गेले होते. स्थानिक सरपंचाच्या मदतीने पोलिसांनी त्या महिलेला शोधले. कुर्ला रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र काैतुक होत आहे.

बेपता असलेली लहान मुले आणि महिलाचा शोध घेण्यासाठी ऑपेरेशन मुस्कान 09 सध्या सुरु आहे. या ऑपरेशननुसार दोन वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक महिला बेपता असल्याने तिच्या शोधासाठी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एक पथक तयार केले. वरिष्ठ निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस नाईक सावंत यांनी तपास सुरु केला.

नालासोपारा येथे राहणारी महिला सासरी जाण्यासाठी तिच्या नवऱयासोबत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आली होती. तिच्या नवऱयाने तिला उत्तर प्रदेशला जाणाऱया एक्सप्रेसमध्ये बसवून दिले. दोन दिवसानंतर तिच्या नवऱयाने घरी फोन केला. तेव्हा ती घरी आली नसल्याचे समजले. ती बेपता झाल्याप्रकरणी तिच्या नवऱयाने कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या नवऱयाला फोन केला. तो नंबर बंद होता. जो पत्ता दिला होता, त्यावरून पोलीस तेथे गेले. मात्र तेथे राहत नव्हता. ते दोघे कुठे असतील हे स्पष्ट होत नव्हते. अखेर पोलिसाना त्या महिलेच्या भावाचा नंबर मिळाला. पोलिसानी महिलेच्या भावाला शोधून काढले. त्याला महिलेबाबत विचारणा केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अखेर पोलिसांनी त्याला विश्वासात घेतल्यावर त्याने ती उत्तर प्रदेशला राहत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशला गेले.

स्थानिक सरपंचाची घेतली मदत

पोलिसांनी काैशल्याचा वापर करून त्या महिलेची माहिती काढली. तिच्या शोधासाठी पोलिसांनी स्थानिक सरपंचाची मदत घेतली. पोलीस तिच्या घरी गेले. तेव्हा तिने तिचे खोटे नाव सांगितले. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिने नवऱयाच्या त्रासाला कंटाळून ते पाऊल उचल्याचे तिने पोलिसांना सांगितले.