‘गगनयान’च्या आंतरळावीरांसाठी मेन्यू रेडी, गरमागरम इडली-हलव्यासह मिळणार हे पदार्थ

gaganyaan-food

अंतराळ संशोधन क्षेत्रात हिंदुस्थान मोठी झेप घेण्यासाठी सज्ज होत असून ‘गगनयान’साठीची तयारी जोरात सुरू आहे. गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. या अंतराळवीरांना अंतराळात प्रवास करताना सोबत भोजनासाठी म्हणून एग रोल, व्हेज रोल, इडली, मूगाच्या डाळीचा हलवा, व्हेज पुलाव असे ;रेडी टू इट’ पॅकेट्स गगनयानमध्ये देण्यात येणार आहेत. तसेच पाणी, ज्युस पिण्यासाठी देखील विशेष पॅक तयार करण्यात आले आहेत.

हिंदुस्थानच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे. इस्रोकडून निवड करण्यात आलेल्या चार जणांना सात दिवसांच्या या प्रवासात खाण्याची सोय करण्यात आली असून त्यांच्यासाठी विशेषपद्धतीने तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ सोबत देण्यात येणार आहेत. हे रेडी टू इट प्रकारातील खाद्य पदार्थ आहेत. डिफेन्स फूड रिसर्च लॅबरोटरीने हे पदार्थ तयार केले असून एग रोल, व्हेज रोल, इडली, मूगाच्या डाळीचा हलवा, व्हेज पुलाव इत्यादी पदार्थांचा त्यात समावेश असणार आहे. तसेच अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने पाणी, ज्युस पिण्यासाठी विशेष प्रकारचे कंटेनर बनवण्यात आले आहेत. ज्याचा वापर गगनयानातील अंतराळवीरांना करता येईल. हे पदार्थ आणि कंटेनर यांवर विविध प्रकारचे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत.

गरमागरम पदार्थ मिळणार

अंतराळात पदार्थ खाणार म्हणजे ते थंडच असतील असा विचार येतो. मात्र अंतराळवीरांना गरमागरम पदार्थ मिळणार आहेत. यासाठी ‘RTE Food Heater’ रेडी टू इट फूड हिटर बॅग तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हे पदार्थ गरमकरून खाता येणार आहेत.

rte-food-heater

दरम्यान, गगनयानसाठी निवड करण्यात आलेल्या चार अंतराळवीरांना रशियात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल. तसा करार रशियाची अंतराळ संस्था ग्लावकॉस्मोसबरोबर करण्यात आला आहे. गगनयानसाठी एक राष्ट्रीय सल्लागार समितीही स्थापन करण्यात आली असून 2019 मध्येच गगनयान मोहिमेत इस्रोने चांगली प्रगती केल्याचे इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी 1 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते.

गगनयान प्रोजेक्टचा पहिला टप्पा म्हणून अनमॅन्ड म्हणजेच मानवरहित मिशनचं या वर्षात प्लानिंग करण्यात येईल. जर हे काम पूर्ण झाले तर यंदा किंवा मग पुढल्यावर्षी पूर्ण करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले होते.

‘चांद्रयान-3’साठी 250 कोटी रुपये खर्च

चांद्रयान-3 मोहिमेसाठी सरकारची मंजुरी मिळाली असून या मोहिमेवर 250 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सिवन यांनी सांगितले. या मोहिमेवर कामही सुरू झाले असून चांद्रयान-3 चे स्वरूप, त्याचे विविध भाग चांद्रयान-2 प्रमाणेच असतील, असेही सिवन म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या