मुंबईत 75 ठिकाणी मियावकी वने बहरणार! वडाळय़ाच्या भक्ती पार्कमध्ये 57 हजार झाडांची हिरवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्य झाडांपेक्षा दहा पट वेगाने वाढणारी आणि बहरणारी जपानी पद्धतीची मियावकी वने मुंबईच्या विविध भागांत 75 ठिकाणी लवकरच बहरणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया मियावकी वनीकरण पद्धतीत मुंबईमध्ये सध्या 43 ठिकाणी घनदाट वने बहरली आहेत. जपानी पद्धतीच्या या वनांमध्ये 50हून अधिक प्रकारची 2 लाख 21 हजार 405 झाडे वाढली आहेत.

गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वडाळा (पूर्व) येथील भक्ती पार्क उद्यानातून याची सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमात पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या झाडांनी 5 ते 7 फुटांची उंची गाठली आहे. यात चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सीताफळ, बेल, पारिजातक, कडुनिंब, बांबू, पेरू, पुत्रजिवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, रिठा, शिसम, बकूळ, अर्जुन, फणस,  आवळा, कदंब आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मियावकी वनांची संकल्पना जपानी पद्धतीची असली तरी मुंबईत लागवड करण्यात येणारी झाडे ही देशी प्रजातीची असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

अशी बहरली वने

मियावकी वने कमी जागेत आणि कमी वेळेत वाढणारी असून कोकणातील ‘देवराई’शी आणि सिंगापूरसारख्या शहरांमध्ये असणाऱया अर्बन फॉरेस्ट संकल्पनेवर आधारित आहे. दोन वर्षांत विकसित होणाऱया या वनांमधील झाडांमध्ये कमी अंतर असल्याने ती घनदाट असतात. सध्या बहरलेल्या 43पैकी 14 वने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’मधून साकारण्यात आली आहेत.

12 राशी व 27 नक्षत्रांचे शास्त्रीय महत्त्व

  • भक्ती पार्कमधील या नागरी वनात लागवड केलेल्या 57 हजार झाडांनी चांगलाच जोम धरला असून ती वेगाने बहरत आहेत. पूर्व उपनगरातील सर्वात मोठे उद्यान अशी ख्याती असलेल्या भक्ती पार्कमध्ये 12 राशी आणि 27 नक्षत्रांचे शास्त्राrय महत्त्व सांगणारे उद्यानही विकसित झाले आहे. या ठिकाणी आता विविध प्रजातींची फुलपाखरे, पक्षी, कीटक यांचा नैसर्गिक अधिवास वाढू लागला आहे.
  • भक्ती पार्क उद्यानात जपानी शैलीनुसार विविध सेवा-सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यात सुमारे 3 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा जॉगिंग ट्रक पदपथ, गजिबो, हिरवळ (लॉन), रंगबेरंगी फुलझाडे, टॉपिअरी व अद्ययावत सुविधांचा समावेश आहे.
  • या उद्यानात देशी, परदेशी औषधी प्रजातींची सुमारे 2 हजारपेक्षा मोठी फुलझाडे व फळझाडे आहेत. यात प्रामुख्याने खैर, सुरंगी, आवळा, अर्जुन, पिंपळ, उंबर, बकुळ, आंबा, जांभूळ, कांचन, बदाम, निलगिरी, फणस, भोकर, बेल, सुरू, रॉयल पाम, कडीपत्ता, नारळ इत्यादींचा समावेश आहे.