मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा अहवाल, आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ

2716

बडनेरा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडणीमध्ये वाढ झाली आहे. रवी राणा यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च केल्याचा अहवाल निवडणूक निरीक्षकांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या राहणार्‍या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा घालून दिली होती. ही मर्यादा 28 लाख रुपयांपर्यंत होती. या खर्च मर्यादेबाबत राज्य निवडणूक आयोगाद्वारे व केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे उच्च दर्जाचे अधिकारी निवडणूक निरीक्षक ऑब्झर्वर म्हणून नियुक्त करण्यात येतात. त्यानुसार बडनेरा विधानसभा मतदारसंघात प्रमाणापेक्षा जास्त खर्च करणार्‍या आमदार रवी राणा यांच्यावर निवडणूक निरीक्षकाकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यासोबतच रवी राणा यांना वेळोवेळी खर्च संदर्भात समजही देण्यात आली होती. निवडणूक खर्च मर्यादेपेक्षा दीडपट जास्त रक्कम खर्च करणार्‍या रवी राणा यांच्या सादर करण्यात आलेल्या हिशोबाच्या ताळ्यावर आक्षेप घेऊन निवडणूक निरीक्षक यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला.

rana

शिवसेनेच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमती प्रीती संजय बंड यांची निवडणूक प्रतिनिधी असलेले अशिष धर्माळे यांनी राणा यांच्या हीशोबा संदर्भात माहिती मागितली. यावर आमदार रवी राणा यांच्या निवडणूक खर्चा संदर्भात इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया यांना प्रकरण सादर करण्यात आले असल्यामुळे माहिती देण्यासाठी असमर्थता दर्शविली. त्याबाबतचे लेखी पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी देऊन सदर माहिती देण्यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सुद्धा मार्गदर्शन मागितले आहे.

याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी जमीन वाटप प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांना नोटीस बजावून चार आठवडयात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या