आता गद्दार आमदार बांगर मिशी काढणार म्हणे..! सर्व जागा जिंकण्याच्या वल्गना केल्यानं सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकला तर गद्दार आमदार संतोष बांगर यांना साफ झिडकारले. दरम्यान, फक्त निवडणुकीच्या काळात फिरणाऱ्या गद्दार बांगर यांनी एका सभेत भाजप व मिंधे गटाचेच 17 संचालक निवडून येणार असे जाहीर केले होते. आणि 17 संचालक निवडून नाही आले तर आपण मिशी काढून फिरणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता गद्दार बांगर मिशी काढून फिरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार या चार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच समोर आले आहेत. यामध्ये कळमनुरी व जवळा बाजार समितीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. तर भाजप व मिंधे गटाचा सुपडा साफ झाला आहे. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी गद्दार आमदार संतोष बांगर यांनी जंग जंग पछाडले होते. दरम्यान, भाजप व मिंधे गटाच्या उमेदवारांसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील एका सभेत गद्दार आमदार बांगर म्हणाले की, जवळा बाजार येथे आपलेच पॅनल निवडून येणार आहे. त्या पद्धतीनेच कळमनुरीतीलही पॅनेल पूर्ण बहुमताने निवडून येणार आहे. कळमनुरीत महाविकास आघाडी एक झाली आहे. परंतु, त्याचा आपल्यावर कोणत्याही परिणाम होणार नाही. तुम्हा सगळ्यांना सांगतो नागनाथाच मंदिर इथे समोर आहे ध्यानात ठेवा नागनाथाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला की, कळमनुरीत 17 पैकी 17 जर सिटा संचालक पदांच्या नाही निवडून आल्याना तर हे संतोष बांगर ही मिशी ठेवणार नाही हे ध्यानात ठेवा.. एका मतदाराकडे बघून ‘आल का मामा लक्षात’ … आपल्याकडे ते अजिबात जमतच नाही. म्हणून तुम्हा मतदार बांधवांना विनंती करण्यासाठी आलो आहे की आपल्या गटाच्या सर्व उमेदवारांना मतदान करा, असे वक्तव्य गद्दार आमदार संतोष बांगर यांनी केले होते. रविवारी जवळा बाजार व कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला. जवळा बाजार येथे 16 तर कळमनुरीत 12 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. संतोष बांगर यांनी निवडणूक काळात मिशी काढून फिरतो असे व्यक्तव्य करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता गद्दार आमदार बांगर मिशी काढणार म्हणे..! अशा अनेक कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.