
राज्यातील सत्ताधारी महायुतीतील आमदार-मंत्र्यांचे रोज एक प्रकरण उघडकीस येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाने सोमवारी रात्री दौंडनजीक न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार केला. हे प्रकरण दाबण्यासाठी यवत पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र मीडियात बातमी आल्यानंतर 36 तासांनंतर चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे व एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाखारी परिसरात न्यू अंबिका कला केंद्र असून त्या ठिकाणी 21 जुलैला रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी गाण्याची बारी पाहण्यासाठी बसले होते. त्यावेळी काही कारणांवरून वाद झाला. नंतर हे चौघेही आरोपी कला केंद्रातून बाहेर आले व एकाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर ते घटनास्थळाहून निघून गेले. गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून या प्रकरणी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे.
पोलीस प्रकरण दाबत आहेत – रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी कला केंद्रामधील गोळीबाराच्या घटनेचा भंडापह्ड केला. ते म्हणाले, ‘‘आमदाराच्या बंधूने त्या ठिकाणी गोळीबार केला. त्यात एक महिला जखमी झाली आहे. पोलीस माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील, तर योग्य ठरणार नाही. पोलीस अधिकारी माहिती लपवत आहेत म्हणून कारवाई करावी लागेल. खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे. सत्तेतील लोकांचा दबाव आहे. हा कसला सत्तेचा तमाशा? जखमी महिलेवरही दबाव आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.
आमदार मांडेकर म्हणाले…
गोळीबार प्रकरणावर आमदार मांडेकर यांनी आज सायंकाळी प्रतिक्रिया दिली. ‘‘घटनेची माहिती मला नाही. पोलिसांनी रीतसर कारवाई करावी,’’ असे ते म्हणाले.