आसाममध्ये संतप्त जमावाने भाजप नेत्याचं घर जाळलं; कर्फ्यू लागू, हिंसाचारात CRPF जवानासह अनेक जखमी

आसाममधील पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात सोमवारी संतप्त जमावाने कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदेचे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तुलीराम रोंगहांग यांचे वडिलोपार्जित घर पेटवून दिले. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबार केला. यात तीन आंदोलक जखमी झाले असून सीआरपीएफचा एक जवानही जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून प्रशासनाने कर्फ्यू लागू केला आहे.

पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्यात सरकारी जमिनींवरील कथित अतिक्रमण हटवण्याच्या मागणीवरून 9 आंदोलक गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषण करत होते. पोलिसांनी उपोषण करणाऱ्यांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने खेरोनी आणि आसपासच्या भागातील घरे, दुकाने आणि सरकारी मालमत्तांची तोडफोड करत आग लावून दिली.

बघता बघता हिंसाचाराची ही आग भाजप नेते तुलीराम रोंगहांग यांच्या डोंगकामुकम भागातील घरापर्यंत पोहोचली. जमावाने रोंगहांग यांच्या घरावर मोर्चा काढला आणि दगडफेक करत त्यांचे घर पेटवून दिले. रोंगहांग यांचे वयोवृद्ध वडील त्याच घरात राहतात. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा ते घरात नव्हते. घरामध्ये फक्त सुरक्षा कर्मचारी तैनात होते, अशी माहिती रोंगहांग यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

पश्चिम कार्बी जिल्ह्यातील 7114.7 एकर सरकारी जमिनीवरील कथित अतिक्रमण हटवावी अशी आंदोलकांची मागणी आहे. या जागेवर बाहेरील लोकांनी कब्जा केल्याचा दावा आंदोलकांनी केला. हे अतिक्रम हटवण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून बेमुदत उपोषण सुरू होते. रविवारी रात्री पोलिसांनी एका युवा नेत्यासह 9 आंदोलकांना ताब्यात घेतल्याने तणाव वाढला.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकृती खालावल्याने काही आंदोलकांना गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले होते. परंतु त्यांच्या अटकेची अफवा पसरली आणि जमाव संतप्त झाला. आम्ही अतिक्रमण हटवण्याबाबत जागरूक आहोत. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू शकत नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून हिंसाचार हा पर्याय नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कर्फ्यू लागू

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने कर्फ्यू लागू केला असून 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती एकत्र जमवण्यावर, मिरवणुका काढण्यावर आणि भाषणांवर बंदी घातली आहे. तसेच सायंकाळी 5 ते सकाली 6 या वेळेत खासगी वाहने आणि व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध घातले आहे. आसामचे पोलीस महासंचालक हरमीत सिंग यांनी घटनास्थळी धाव घेतली असून शिक्षण मंत्री रणोज पेगू आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय.