2021 ची जनगणना मोबाईल ऍपवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थानची 2021ची जनगणना मोबाईल ऍपच्या मदतीने करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. 140 वर्षांच्या इतिहासात प्रथमच देशात जनगणनेसाठी अशा ऍपचा वापर होणार आहे. देशाच्या 2021च्या महाजनगणनेसाठी गृहमंत्रालय एकूण 33 लाख कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार आहे. या प्रत्येक कर्मचार्‍याला जनगणनेचा डेटा नोंद करण्यासाठी आपल्या स्वतःचा मोबाईल वापरता येणार आहे. हा डेटा त्याला जनगणना विभागाकडे मोबाईलवरूनच हस्तांतरित करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी दिली आहे. जनगणना कर्मचार्‍यांना त्यांच्या कामासाठी समाधानकारक मोबदला देण्याचा निर्णयही केंद्राने घेतला आहे.

शिफारशी मागवल्या

2021ची राष्ट्रीय जनगणना हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे नव्या हायटेक पद्धतीने जनगणनेचे काम वेगवान आणि अचूक कसे करता येईल याबाबत गृह मंत्रालयाने सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांकडून शिफारशी मागवल्या आहेत. शिवाय जनगणना कर्मचार्‍यांना त्यांनी जमवलेला डेटा गुप्त ठेवण्याचेही निर्देश केंद्राने दिले आहेत.