सचिन, कोहली, पॉन्टिंगला जे जमलं नाही ते शमीने करुन दाखवलं, लॉर्डसवर केली ऐतिहासिक कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावर झालेल्या रोमहर्षक लढतीत टीम इंडियाने यजमान इंग्लंड संघाचा 151 धावांनी पराभव केला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या के.एल. राहुलसह दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक ठोकणारा मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याला साथ देणारा जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाच्या विजयाचे नायक ठरले. दोघांनी नवव्या विकेटसाठी 89 धावांची अभेद्य भागिदारी करत टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. बुमराहने नाबाद 34 धावा केल्या, तर मोहम्मद शमीने नाबाद 56 धावा केल्या. या खेळीसह त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावे केला.

लॉर्डस मैदानावर अर्धशतक ठोकून मोहम्मद शमी याने सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा, रिकी पॉन्टिंग, विराट कोहली, ए.बी, डिव्हीलिअर्स यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. लॉर्डसवर कोहलीचा सर्वोच्च स्कोर 42 आहे, तर सचिन तेंडुलकरचा 37, ए.बी. डिव्हीलिअर्सचा 43, रिकी पॉन्टिंगचा 42 आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस याचाही या मैदानावरील सर्वोच्च स्कोर 54 आहे, त्याला देखील शमीने मागे सोडले आहे.

सात वर्षानंतर दुसरे अर्धशतक

दरम्यान, कसोटी कारकिर्दीमध्ये सातव्या-आठव्या किंवा दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणारा शमी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. मात्र गेल्या सात वर्षापासून तो कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकीय खेळी करू शकला नव्हता. मात्र लॉर्डस कसोटीमध्ये संधी साधत त्याने नाबाद अर्धशतक ठोकले. याआधी 2014 ला इंग्लंड दौऱ्यातच त्याने अर्धशतकीय खेळी केली होती.

Photo – लॉर्डसवरील हिंदुस्थानचे ‘शतक’वीर, यादीत गोलंदाजाचे नाव वाचून व्हाल अवाक

धोनी-सेहवागची बरोबरी

मोहम्मद शमी याने अर्धशतक ठोकून विरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी यासारख्या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे. हिंदुस्थानकडून आतापर्यंत लॉर्डस मैदानावर 33 खेळाडूंनी अर्धशतक ठोकले आहे. यात शमीच्याही नावाचा समावेश आहे. मात्र सचिन तेंडुलकरची बॅट लॉर्डस मैदानावर नेहमीच शांत राहिली आहे. या मैदानावर सचिलला साधे अर्धशतककी ठोकला आले नाहीय.