
हिंदुस्थानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा सध्या त्याच्या कारकिर्दीतला उत्तम खेळ करत आहे. सर्व मालिकांमध्ये सरस खेळ करणाऱ्या शमीला मधल्या काळात त्याच्या खासगी आयुष्यामुळे कठिण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. नुकतंच शमीने रोहित शर्मा सोबत इंस्टाग्राम लाईव्ह चाट करताना त्याच्या आयुष्यातील त्या वाईट प्रसंगाविषयी सांगितले आहे. ते सांगताना तो भावुकही झाला असून त्याने चक्क त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती असे सांगितले आहे.

‘2015 च्या विश्वचषकाच्या वेळी मी जखमी झालो त्यानंतर मला पूर्ण बरं व्हायला 18 महिने लागले. तो माझ्या आयुष्यातील एक वाईट व सर्वात तणावपूर्ण काळ होता. त्यानंतर जेव्हा मी मोठ्या मेहनतीने संघात पुन्हा आलो तेव्हा माझ्या खासगी आयुष्यात तणाव सुरू झाला. जर त्यावेळी माझ्या कुटुंबाने मला साथ दिली नसती तर मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो. त्यावेळी माझ्या कुटुंबातले एकतरी व्यक्ती चोवीस तास माझ्यासोबत असायची. मी मानसिकदृष्ट्या आजारी होतो. जर तुमचं कुटुंब तुमच्यासोबत असेल तर तुम्ही त्या संकटातून बाहेर येता. जर माझं कुटुंब नसतं तर मी ते पाऊल उचललं असतंच’, असे शमीने सांगितले.
पत्नी हसीन जहाँने मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी यासारखे अनेक गंभीर आरोप केले आहेत. हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याचाही आरोप केला होता. मात्र बीसीसीआयने शमीला फिक्सिंगच्या आरोपात क्लीन चिट दिली आहे.



























































