
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हटले आहे की, लग्नासाठी हिंदू युवक युवतींनी धर्म परिवर्तन करणे चुकीचे आहे. तसेच युवक-युवतींच्या कुटुंबीयांनी देखील धर्माबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणे आवश्यक असल्याचेही भागवत यांनी म्हटले आहे.
ANI या वृत्तसंस्थने दिलेल्या माहितीनुसार सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे हे विधान केले आहे. मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या एका कार्यक्रमात संघाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. भागवत म्हणाले, ‘धर्म परिवर्तन कसे होते? क्षुद्र स्वार्थासाठी, लग्नासाठी? हिंदू युवक-युवती लग्नासाठी अन्य धर्म का स्वीकारतात? जे असं करतात ते मोठी चूक करतात, मात्र हा वेगळा मुद्दा आहे. मुळात आपण आपल्या मुलांचे पालन पोषण योग्य पद्धतीने करतो का? आपल्या मुलांना घरातूनच याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यांच्या आपल्या धर्माविषयी आदर, अभिमान निर्माण केला पाहिजे.’
सरसंघचालकांनी इथे उपस्थितांना धर्माबद्दल कुटुंबातूनच जागरुकता निर्माण केली पाहिजे या मुद्द्यावर अधिक जोर दिला. कुटुंबातील व्यक्तींनी धर्मासंबंधित विविध प्रश्नांच्या बाबतीत निशंक होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जर आपण निशंक झालो तर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण योग्य देऊ शकू आणि त्यांच्यातील संभ्रम दूर होईल असेही ते म्हणाले. मुलांना तयार करण्यासाठी पालकांना, कुटुंबातील अन्य व्यक्तींना आधी स्वत:ला तयार करावे लागेल. अनेक गोष्टी आत्मसात कराव्या लागतील, असेही ते म्हणाले.
तसेच पर्यटन स्थळांवर जाताना घरी शिजवलेले अन्न खाणे आणि पारंपारिक पेहराव ठेवला पाहिजे असा सल्लाही दिला.





























































