
‘जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या नोंदणीकृत नाहीत. हिंदू धर्मदेखील नोंदणीकृत नाही, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तरी नोंदणी हवी कशाला,’ असा तर्क सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिला. आरएसएसला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. आरएसएस ही संघटना अद्यापही नोंदणीकृत का नाही, असे प्रश्न अलीकडेच काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केले होते. त्यावर भागवत यांनी उत्तर दिले. ‘संघाचा जन्म 1925 साली झाला. त्यावेळी ब्रिटिशांची राजवट होती. आम्ही त्या सरकारकडे नोंद करायला हवी होती का? स्वातंत्र्यानंतर कायद्याने नोंदणीचे बंधन नव्हते, असे भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही व्यक्तींची संघटना आहे. व्यक्तींच्या संघटनेला कायदेशीर दर्जा आहे. त्या न्यायाने आम्ही मान्यताप्राप्तच आहोत, असे ते म्हणाले.
संघावर तीन वेळा बंदी आली होती. मान्यता नसती तर बंदी आलीच नसती. आमच्यावरील बंदी कोर्टात कधीच टिकली नाही. इन्कम टॅक्स विभागानेही आम्हाला संघटन म्हणून मान्यता दिली आहे. आरएसएसला इन्कम टॅक्समध्येही सूट आहे. याचाच अर्थ आम्हाला मान्यता आहे. आरएसएस ही घटनाबाह्य संघटना नाही. त्यामुळेच आम्ही आजपर्यंत नोंदणी केलेली नाही, असेही भागवत म्हणाले.
तिरंग्याबद्दल आदरच!
आरएसएसने स्वतःचा अधिकृत ध्वज म्हणून 1925 साली भगवा स्वीकारला. हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज 1933 मध्ये प्रत्यक्षात आला. राष्ट्रध्वज भगवाच असावा अशी शिफारस त्यावेळी करण्यात आली होती. महात्मा गांधींनी काही कारणास्तव त्यास आक्षेप घेतला. त्यानंतर भगव्यासह तिरंगा हा राष्ट्रध्वज झाला. मात्र तेव्हापासून तिरंग्याचा सन्मान संघाने नेहमीच राखला आहे, असे भागवत म्हणाले. संघाचा कोणताही राजकीय पक्ष नाही. आम्ही धोरणांना, राष्ट्रवादाला पाठिंबा देतो. काँग्रेसने राम मंदिर आंदोलन चालवले असते तर आम्ही त्यांनाही पाठिंबा दिला असता, असेही भागवत म्हणाले.



























































