लहानग्याचे लैंगिक शोषण करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी, नराधमाला ‘पोक्सो’ कोर्टाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहा वर्षांच्या लहानग्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला विशेष पोक्सो न्यायालयाने चांगलाच दणका दिला. 25 वर्षीय आरोपी मोहनीश मोहन म्हात्रे याला ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुह्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या कलम 235(2) अन्वये दोषी ठरवले. याचवेळी त्याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष ‘पोक्सो’ न्यायाधीश एस. सी. जाधव यांनी हा निर्णय दिला.

चुनाभट्टी येथील रहिवासी असलेल्या आरोपी मोहनीश म्हात्रे याने पीडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावले होते. घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने लहानग्याचे लैंगिक शोषण केले होते. मे 2019 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मोहनीशला अटक केली होती. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील वीणा शेलार, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. आनंदे व इतर अधिकाऱयांनी भक्कम पुरावे न्यायालयापुढे सादर केले. त्याची दखल घेत विशेष न्यायाधीश जाधव यांनी आरोपी मोहनीशला दोषी ठरवले आणि 10 वर्षांचा सश्रम कारावासासह 5 हजारांचा दंड ठोठावला.

दरम्यान, 2016 मध्ये भायखळा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या पोक्सो गुह्यातील आरोपी अनिल बैजनाथ सरोज याला विशेष न्यायाधीश ए. यू. कदम यांनी दोषी ठरवले. सरोजला 12 वर्षांचा कारावास आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात विशेष सरकारी वकील वीणा शेलार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस उपनिरीक्षक अमर ढेंगे, रमेश करवंदे, संतोष सावंत आणि किशोर रामाणे यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.