
मोहोळ तालुक्यातील आष्टे येथील सीना नदीतून अवैध वाळूउपसा करणाऱया दोन टोळ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. यात ट्रक्टर, यारी मशीनसह पाच हायड्रोलीक टेम्पो असा 35 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 17 जणांवर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष ब्रह्मदेव आरकिले (रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर), समीर लक्ष्मण मासाळ, रामचंद्र अर्जुन नरोटे, बापू खरात, राहुल खरात (सर्व रा. आष्टे, ता. मोहोळ), समाधान शेकाप्पा शिवशरण, अप्पा श्रीरंग मोरे, दिनकर अंबादास वाघमोडे, विलास हुकूम वाघमोडे, सदाशिव महादेव वाघमोडे, पोपट शिवाजी वाघमोडे, बजरंग शिवाजी मोरे, उत्तम बलभीम वाघमोडे (सर्व रा. नजीक पिंपरी, ता. मोहोळ), दत्तात्रय प्रल्हाद चवरे, अच्युत गायकवाड सिकंदर धोत्रे (रा. मोहोळ) आणि दीपक बाळासाहेब झेंडगे (रा. हिंगणी नि., ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे, बेकायदेशीर वाळूउपसा राजरोसपणे सुरू असल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आष्टे गावात सीना नदीतून वाळूउपसा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांचे पथक शुक्रवारी मध्यरात्रीपासून आष्टे गावात सीना नदीकाठच्या शेतातील पिकात दबा धरून बसले होते.
मध्यरात्री वाळूतस्करांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सीना नदीपात्रात वाळूउपसा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलीस पथकदेखील दोन गटांत विभागले गेले. शनिवारी सकाळी पावणेसात वाजता पोलीस पथकाने दोन्ही ठिकाणच्या वाळूतस्करांना गराडा घालून पकडले. त्यापैकी काही वाळूतस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरले.
यावेळी पोलीस पथकाने टेम्पो, ट्रक, वाळूउपसा करणारे यारी मशीन व वाळूसाठा यांसह तब्बल 35 लाख 3 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 17 पैकी 12 आरोपींना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वाहनमालक बापू खरात, राहुल खरात, अच्युत गायकवाड, सिकंदर धोत्रे, दीपक झेंडगे या आरोपींचा शोध सुरू आहे. सहायक फौजदार शिंदे तपास करीत आहेत.



























































