
मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यामध्ये अवसनी विभागातील बायोडायजेस्टर गॅसची टाकी अचानक कोसळून मिथेन गॅस व द्रवरूप पदार्थ बाहेर पडला. विषारी वायूमुळे गुदमरून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य आठ कामगार अत्यवस्थ आहेत. रविवारी पहाटे ही घटना घडली.
दोन मृत्युमुखी, आठ अत्यवस्थ
ज्योतिबा दादाराव वगरे (वय 45), सुरेश अंकुश चव्हाण (वय 22, दोघे रा. बिटले, ता. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. सज्जन बाळू जोगदंड, कल्याण किसन गुंड (रा. बिटले), मंगेश नामदेव पाचपुंड, महेश दिलीप बोडके, रवींद्र गजेंद्र काकडे, संजय बाजीराव पाचपुंड (रा. अनगर), परमेश्वर मधुकर थिटे (रा. नालबंदवाडी), राजू दत्तात्रय गायकवाड (रा. कुरणवाडी) अशी अत्यवस्थ रुग्णांची नावे आहेत.
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे लोकनेते साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्याचबरोबर सहवीजनिर्मिती व अवसनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कारखान्याच्या अवसनी विभागातील बायोडायजेस्टर गॅस टाकी अचानक पडल्याने मोठा आवाज झाला.
काही कळायच्या आतच त्या टाकीतून मिथेन गॅस व द्रवरूप पदार्थ बाहेर पडल्याने ज्योतिबा वगरे आणि सुरेश चव्हाण या दोन कामगारांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. कारखान्याचे अवसनी विभागप्रमुख रावसाहेब आवताडे यांनी त्यांना मोहोळ ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
या घटनेत जवळच काम करणारे सात कामगार अत्यवस्थ आहेत. कारखाना व्यवस्थापन आणि अन्य कामगारांनी त्यांना तत्काळ सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून मोहोळ पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे तपास करीत आहेत.
दरम्यान, लोकनेते कारखान्याचे चेअरमन राजन पाटील यांनी मृतांच्या वारसांना व जखमी कामगारांना शासनाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम नुकसानभरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.



























































