
सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा सराईत गुंड विनोद जामदारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही 10 वी कारवाई आहे. त्यामुळे टोळ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
विनोद शिवाजी जामदारे (वय 32, रा. सर्वोदय लॉन, वडगाव ,मूळ रा. लोणारवाडी, धाराशिव ), आकाश सुभाष गाडे (वय 21, रा रामनगर, माणिकबाग, सिंहगड रस्ता), गमेश दिलीप म्हसकर (वय 23, रा. कुमार अपार्टमेंट, माणिकबाग, सिंहगड रस्ता, मूळ रा. आंबी, ता. पानशेत, ) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
किरकोळ वादातून सराईत जामदारे याने 16 नोव्हेंबरला तरुणावर हल्ला केला होता. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दहशत माजविली होती. साथीदारांनी सिंहगड रस्ता भागातील वडगाव, धायरी, हिंगणे, माणिकबाग, दत्तवाडी, वारजे भागात गुन्हे केले होते. त्यांच्याविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर यांनी अपर आयुक्त राजेद्र डहाळे यांना सादर केला. त्यानुसार पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरूद्ध मोक्का कारवाईचे आदेश दिले. मोक्का प्रस्ताव तयार करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, मीनाक्षी महाडिक, स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांनी केली. गुन्ह्याचा तपास एसीपी राजेंद्र गलांडे करीत आहेत.