मुंबईतील महिलांचा ‘वॉटर पार्क’मध्ये विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

मुंबईतून कामशेत येथील ‘वॉटर पार्क’मध्ये पर्यटनासाठी आलेल्या दोन महिलांचा एकाने विनयभंग केला. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ‘वेट ऍण्ड जॉय’ वॉटर पार्कमध्ये घडली.

विकास मारुती घोलप (28, रा. घोलपवाडी, भीमा बाकळी, ता. शिरूर) असे आरोपीचे नाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत-मुंढावरे येथे ‘वेट ऍण्ड जॉय’ या नावाने ‘वॉटर पार्क’ आहे. या वॉटर पार्कमध्ये मुंबई-गोरेगाव येथून नणंद-भावजय कुटुंबासह शनिवारी पर्यटनासाठी आल्या होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास दोघी वॉटर पार्कमधील व्हेव पुलाच्या पाण्यात खेळत असताना आरोपी घोलप याने त्यांचा विनयभंग केला. त्यांनी त्याला हटकले असता तो मित्रांच्या घोळक्यात घुसला. ‘वॉटर पार्क’मधील सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. फिर्यादीच्या पतीने जाब विचारला असता त्याने दोन्ही महिलांची माफी मागितली. त्याच्याविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक ए. जे. गायकवाड तपास करत आहेत.