
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
उन्हाळ्यात तहानेने व्याकुळ झालेले वन्यजीव जंगलातून गावांच्या दिशेने, नागरि वस्त्यांच्या दिशेने येतात. मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील एका गावात पाण्याच्या शोधात गावात आलेल्या एका वानराचा विजेच्या तारेला चिकटून मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या वानराची अंतयात्रा काढण्यात आली आणि गावातील हनुमान मंदिराच्या जवळ विधिवत पूजा करून दफनविधी करण्यात आला.
पाण्याचा शोध घेताना पाणी दिसताच एका घरावरून दुसऱ्या घरावर उडी घेणाऱ्या वानराचा मध्येच विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. मनाला चटका लावणारी घटना पैठण तालुक्यातील आडगाव (जावळे) येथे आज घडली. मुक्या प्राण्यांनाही भावना असतात याची प्रचिती आज आली. तारेला स्पर्श होताच वानर मृत्युमुखी पडले. ग्रामस्थांनी वनविभाग कर्मचाऱ्यांना ही बातमी कळवली. तो पर्यंत इतर दोन वानरांनी ग्रामस्थांना सुमारे अर्धा तास जवळ या मृतदेहाजवळ येऊ दिले नाही. गावात दुखाची वार्ता पसरावी तशी सगळीकडे ही बातमी कळाली सर्व गाव काही वेळात जमा झाले. गावातील भजनी मंडळाने विविध अभंग, भजनं गात साश्रू नयनांनी भावपूर्ण निरोप दिला. यावेळी श्रद्धांजली अर्पण करताना शाळेतील शिक्षक परमेश्वर गोटे यांनी दुष्काळ पडल्याने वन्यजीव गावात येत आहेत. त्या मुक्या प्राण्यांना मोकळ्या जागी पाणी ठेवा येणाऱ्या काळात जास्त प्रमाणात झाडे लावा. जेणेकरून जास्त पाऊस झाल्याने वन्यजीव गावात येणार नाही असे मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील अमोल चिंतामणी, राजू जावळे, किशोर तोरकडे , बाळू जावळे, जनार्धन तागड, बालाजी जावळे, गणेश सरोदे, संजय चिंतामणी, सतिश जावळे, ज्ञानेश्वर तोरकडे, शंकर जावळे ,संजय गांगे, बाप्पासाहेब गोर्डे, शिक्षक परमेश्वर गोटे , महिला मंडळ, ग्रामस्थ व युवक वर्ग व बालक मोठया संख्येने उपस्थित होते.






























































