उत्तर प्रदेशातील बदाऊमध्ये माकडाने पाडला पैशांचा पाऊस!

लहानपणी प्रत्येकाने माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट ऐकली आहे. या गोष्टीची प्रचिती उत्तर प्रदेशातील बदाऊमधील एका वकीलाला आली. बदाऊतील कार्यालयातून नोटांनी भरलेली बॅग घेऊन वकील बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हातातील बॅग एका माकडाने हिसकावली आणि झाडावर जाऊन त्यातील नोटा उडवू लागले. त्यामुळे पैशांचा पाऊस होत असल्याची अफवा परिसरात पसरली आणि तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नोटा जमा करण्यासाठी जमावाची झटापट झाली. त्यात अनेक नोटा फाटल्या आहेत. या घटनेने वकीलाला आर्थिक नुकसान झाले आहे.

बदाऊतील आपल्या कार्यालयातील 65 हजार रुपयांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी वकील सोबरन सिंह निघाले होते. त्यावेळी अचानक एका माकडाने त्यांच्या हातातील बॅग हिसकावली आणि ते झाडावर पळाले. झाडावर गेल्यावर दुसऱ्या एका माकडाने त्याच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या झटापटीत बॅग उघडली. बॅगेतील नोटा बघून माकडे चेकाळली आणि त्यांनी बॅगेतील नोटा काढून उडवण्यास सुरुवात केली. अचानक हवेतून नोटा पडायला लागल्याने नोटांचा पाऊस पडत असल्याची अफवा पसरली आणि परिसरात एकच गर्दी झाली.  माकड फेकत असलेल्या नोटा जमा करण्यासाठी जमावात चढाओढ सुरू झाली. त्यात अनेक नोटा फाटल्या आहेत. थोड्याच वेळात घडलेला प्रकार जमावाच्या लक्षात आला आणि नोटांचा पाऊस होत नसून ही माकडांची कमाल असल्याचे जमावाला समजले. त्यांनी जमा केलेल्या नोटा वकील सोबरन सिंह यांना परत केल्या. मात्र, माकडांनी केलेल्या करामतीमुळे वकीलांना फक्त 57 हजार रूपयेच परत मिळाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या