जगभरात मंकीपॉक्सचे थैमान; डब्ल्यूएचओकडून आणीबाणी घोषित, हिंदुस्थानसह 80 देशांना संसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गापासून जग हळूहळू सावरत असतानाच आता ‘मंकीपॉक्स’ने टेन्शन वाढविले आहे. हिंदुस्थानसह 80 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले असून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

अत्यंत वेगाने पसरणारा संसर्ग आजार म्हणून ‘मंकीपॉक्स’ ओळखला जातो. स्कीन टू स्कीन टचसह रुग्णाने वापरलेले कपडे, बेड, खाण्याची प्लेट, ग्लास आदी वस्तूंच्या संपर्कात आल्यास त्याला मंकीपॉक्स संसर्ग होतो. 7 मे रोजी ब्रिटनमध्ये ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर अमेरिकेत तीन रुग्ण, हिंदुस्थानात दोन रुग्ण आढळले. सर्वाधिक मंकीपॉक्स संसर्ग टॉप टेन देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलॅण्ड, इटली आणि बेल्जियमचा समावेश आहे. 80वर देशांमध्ये हा संसर्ग पसरला आहे. आतापर्यंत 16,886 रुग्ण आढळले असून ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सवर निश्चित वॅक्सिन उपलब्ध नाही. परंतु कांजण्यांवरील लस प्रभावी आहे. मात्र रुग्णांच्या संपर्कात येऊ नये, असे आवाहन ‘डब्ल्यूएचओ’ने केले आहे.

लक्षणे
ताप, डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, कंबरदुखी, पाठदुखी, थंडी, थकवा, ग्रंथीमध्ये सूज, कांजण्यांसारखे फोड येणे. हे फोड प्रामुख्याने चेहरा, हात, पाठ, पोटावर येतात आणि लाल चट्टे पडतात.