मोनोरेलला १५ ऑगस्टचा मुहूर्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील मोनोरेल चालवायला आता नवा ऑपरेटर मिळणार आहे. यापूर्वीच्या स्कुमी इंजिनीयरिंग या कंपनीला डच्चू देण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे. आयएलएफएस या कंपनीवर आता मोनोरेल चालवण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरात लवकर झाल्यास येत्या १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर वडाळा ते सातरस्ता या दुसऱया टप्प्यावर मोनोरेल धावू लागेल. एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनोरेलचा बंद असलेला चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा आणि वडाळा-सातरस्ता हा नवा दुसरा टप्पा हे दोन्ही टप्पे एकाच वेळी सुरू करण्याची योजना आहे. म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोरेलच्या डब्यांना आग लागल्याच्या घटनेनंतर चेंबूर-वडाळा मार्गावरील मोनोरेलची वाहतूक बंद करण्यात आली. मलेशियाची स्कुमी इंजिनीयरिंग कंपनी या पहिल्या टप्प्याची ऑपरेटर होती.