मॉन्सून आला रे! केरळमध्ये 8 दिवस आधीच दाखल, पुढील वाटचालीसाठी पूरक वातावरण

देशभरात उष्णतेने त्रस्त झालेल्या जनतेला आता मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. आता मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी पूरक वातावरण आहे. त्यामुळे आता जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. यंदा मॉन्सून त्याच्या नियोजित वेळेपेक्षा 8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या 16 वर्षात तो नियोजित वेळेपेक्षा आधी आला आहे.

नैऋत्य मान्सून शनिवारी केरळमध्ये दाखल झाला. साधारणपणे नैऋत्य मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखला होतो आणि आगेकूच करत 8 जुलै रोजी संपूर्ण देश व्यापतो. तर 17 सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य हिंदुस्थानातून माघारीचा प्रवास सुरू करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो. या आकडेवारीनुसार यंदा मॉन्सून आठ दिवस आधीच केरळात दाखल झाला आहे. याआधी मान्सून 2009 आणि 2001 मध्ये दाखल झाला होता. तेव्हा तो 23 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.

एप्रिलमध्ये भारतीय हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच मॉन्सून लवकर येण्याची शक्यताही वर्तवली होती. त्यानुसार मॉन्सून आठ दिवस आधीच केरळात दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनूकूल वातावरण असल्याने हवामान खात्याने म्हटले आहे.

केरळ व्यतिरिक्त नैऋत्य मान्सून दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांच्या काही भागात पुढे वाटचाल करणार आहे. तसेच दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाची हवामान प्रणाली निर्माण झाल्याची नोंद आहे. पुढील 36 तासांत उत्तरेकडे सरकताना ही कमी दाबाची हवामान प्रणाली आणखी मजबूत होऊ शकते आणि पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.