
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱ्या दिवशी बिहारमधील मतदार यादीच्या फेरपडताळणीचा मुद्दा आजही संसदेत चांगलाच गाजला. निवडणूक आयोग व केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी फलक झळकावत वेलमध्ये धाव घेतली. कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न झाला, परंतु गदारोळ प्रचंड वाढल्याने दोन्ही सभागृहात कामकाज होऊ शकले नाही.
लोकसभेत मतदार यादी फेरपडताळणीच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बिहारच्या मतदार यादीतून सुमारे पन्नास लाखांहून अधिक नावे वगळल्याचे निष्पन्न झाल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाल्याचे दिसले. दरम्यान, लोकसभेचे कामकाज केवळ 20 मिनिटे चालले.
राज्यसभेत गदारोळात कामकाज
राज्यसभेत सभापतीविना सभागृहाचे कामकाज सुरू होत असले तरी गोंधळाची मालिका सारखीच आहे. पीठासीन अधिकारी घनशाम तिवाडी यांनी कार्यक्रम पत्रिका वाचायला सुरुवात करताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी बिहारमधील मतदार यादी फेरपडताळणीचा मुद्दा उपस्थित करीत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तिवाडी यांनी कामकाज सुरुवातीला दुपारी 12, त्यानंतर दुपारी 2 व नंतर दिवसभरासाठी तहकूब केले.
लोकसभा अध्यक्ष संतापले
सभागृहात फलक घेऊन येण्यास मनाई आहे. तुम्ही लोक काळे कपडे सभापतींपुढे फडकवत आहात. रस्त्यावर करतात तशी हुल्लडबाजी सभागृहात करू नका. तुम्ही सर्व खासदार माननीय आहात. माननीयांसारखेच वर्तन ठेवा, उगाच कारवाईची वेळ आणू देऊ नका, अशी तंबी देत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आज चांगलेच संतापले.
ऑपरेशन सिंदूरवर पुढील आठवडय़ात चर्चा
पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ या मुद्दय़ावर सरकारने चर्चा करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर पुढील आठवडय़ाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 28 जुलै रोजी लोकसभेत आणि 29 जुलै रोजी राज्यसभेत चर्चा होणार आहे.
मतदार याद्या फेरतपासणीवर चर्चा होणार नाही
बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणी प्रक्रियेवर आता दोन्ही सभागृहांत चर्चा होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोग निवडणूक घेणार आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वतीने सरकार कुठल्याही प्रकारचे भाष्य करू शकत नाही.