
सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी दोन दिवसांत दुसऱ्यांदा विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातला. आज उपमुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर ‘राईट टू रिप्लाय’वर बोलण्यासाठी आदित्य ठाकरे थोडय़ा विलंबाने सभागृहात आले. सरकारला धारेवर धरण्याचा त्यांचा आवेश पाहून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना बोलू दिले नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झाले. विरोधी बाकावरच्या अन्य सदस्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीही आदित्य ठाकरेंच्या भाषणाला विरोध करीत अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत उतरले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सदस्यांना शांत राहण्यास वारंवार सांगत होते, पण गोंधळ सुरूच ठेवल्याने अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
आदित्य ठाकरेंचा राईट टू रिप्लायचा अधिकार नाकारल्यामुळे भास्कर जाधव संतप्त झाले होते. सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली तेव्हा विरोधी बाकावरच्या सदस्यांनीही प्रत्युत्तर दिले. सत्ताधारी पक्षाचे काही मंत्री विरोधी बाकाच्या सदस्यांच्या अगदी जवळ आले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्व सदस्यांना शांत बसण्याचे आवाहन करीत होते, पण गोंधळ वाढत गेल्यामुळे अखेरीस अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. त्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला.
भास्कर जाधवांना निलंबित करण्याची मागणी
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच मंत्री शंभुराज देसाई उभे राहिले. भास्कर जाधव हे अध्यक्षांकडे पाहून हातवारे करून बोलत होते, दमदाटी करण्याचा प्रयत्न करीत होते. तुम्ही रेटून कामकाज करू शकणार नाही, मनमानीपणे कामकाज करू शकणार नाही, असे भास्कर जाधव हे अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा आरोप शंभुराज देसाई यांनी केला. या सर्वांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि भास्कर जाधव यांनी अध्यक्षांची माफी मागण्याची मागणी केली. भास्कर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी शंभुराज देसाई यांनी केली आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
राईट टू रिप्लाय हा विरोधकांचा अधिकार
त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य अजय चौधरी उभे राहिले. राईट टू रिप्लाय हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. काही कारणामुळे आदित्य ठाकरे यांना सभागृहात वेळेत उपस्थित राहता आले नाही, पण विरोधकांचा अधिकार नाकारता येत नाही असे स्पष्ट केले. विरोधी व सत्ताधारी सभागृहाची दोन चाके आहेत असे मुख्यमंत्री सांगतात, मात्र विरोधकांना बोलायला दिले जात नाही याकडे अजय चौधरी यांनी लक्ष वेधले.
सभागृहात नेमकं काय घडलं?
नियम 294 अन्वये झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. त्यात शिंदे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे गट नेते भास्कर जाधव उभे राहिले आणि ‘राईट टू रिप्लाय’वर भाषण करण्याची परवानगी मागितली.
विरोधकांच्या नियम 293च्या चर्चेला सुरुवात शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे या चर्चेला जो सदस्य सुरुवात करेल त्याच सदस्याला राईट टू रिप्लायवर बोलता येईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
तेव्हा भास्कर जाधव हे हरकतीच्या मुद्दय़ावर बोलण्यास उभे राहिले. त्यांनी भाषणाला सुरुवात करताच आदित्य ठाकरे सभागृहात आले. त्यांनी नियमानुसार ‘राईट टू रिप्लाय’वर बोलण्याची संधी मागितली. पण सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरे यांचा आवेश पाहून त्यांना भाषण करण्यास विरोध केला.
अध्यक्ष दुतोंडी आहेत… भास्कर जाधव भिडले
अटल सेतू बांधला म्हणून सरकार सांगते, सी-लिंक बांधला म्हणून सांगते, मेट्रो आणली म्हणून सांगते, तुमची लायकी आहे का, असे म्हणत भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. सरकार खोटं बोलतेय ते विरोधकांनी ऐकून घ्यावे अशी अध्यक्षांची भूमिका आहे, त्यांना अदानीलाही वाचवायचे आहे, अध्यक्ष दुतोंडी आहेत, असा थेट आरोप जाधव यांनी केला.