Photo – चंद्र-शुक्राची पिधान युती, आकाशात दिसलं विलोभनीय दृष्य

खगोलीय आविष्कार पाहण्याची उत्सुकता अनेकांना असते. शुक्रवारी दुपारी 4.15 ते सायंकाळी 5.50 यादरम्यान चंद्र शुक्राची पिधान युती पाहायला मिळाली. सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला आकाशात कपाळावरील चंद्रकोरी प्रमाणे दिसणाऱ्या अद्भुत नजाऱ्याने आपल्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

 

या दुर्मिळ संयोगामध्ये शुक्र ग्रह चंद्राच्या जवळ येऊन हळू हळू त्याच्या गडद काठाच्या मागे अदृश्य झाला. चंद्र आणि ग्रहांच्या युती वर्षातून अनेक होतात. परंतु, चंद्रकोर आणि शुक्र अशी ही दुर्मिळ युती शुक्रवारी आकाशात पाहायला मिळाली. तर, पृथ्वीचा एकमेव उपग्रह असलेल्या चंद्राची चमक देखील सुमारे 250 पटींनी वाढली होती.

आकाशात चंद्रकोरीच्या अगदी खाली शुक्राची तेजस्वी चांदणी पाहण्याचे विलोभनीय दृश्य अनेकांनी अनुभवले. या घटनेचे अनेक फोटो सोशल मिडियावरही व्हायरल झाले आहेत. मुळात, चंद्र रोज कोणत्या ना कोणत्या ताऱ्यासमोरून जातो, परंतु क्वचित प्रसंगी तो एखाद्या ग्रहासमोरून जातो आणि आपल्याला निसर्गाचा एक अद्‌भूत चमत्कार बघायला मिळतो.

चंद-शुक्राचे तात्पुरते मिलन म्हणजे पिधान युती!

आपल्याला ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती आहे. मात्र, पिधानयुती हे एक प्रकारचे ग्रहणच असते. जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला, की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली, की चंद्रग्रहण होते, तसेच चंद्र ज्यावेळी एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी दिसेनासा होतो. यालाच पिधानयुती असं म्हटलं जातं.