
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाचा जागतिक तेल बाजारावर होणारा परिणाम हा कोविड-19च्या महामारीपेक्षाही भीषण असू शकतो, असा गंभीर इशारा सौदी अरेबियाचे अर्थमंत्री मोहम्मद अल-जादान यांनी दिला आहे. जर हा संघर्ष तातडीने थांबला नाही, तर जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या महिन्याभरापासून इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये आखातात युद्ध सुरू आहे. या संघर्षाचा सर्वोत मोठा फटका तेल आणि गॅस पुरवठ्याला बसला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जगावर ऊर्जा संकट घोंघावत आहे. याच मार्गावरून जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी 20 ते 25 टक्के पुरवठा होतो. हा मार्ग आखाती देशांतून तेल आणि गॅस निर्यात करण्याचा प्रमुख मार्ग आहे. हाच मार्ग इराणने रोखून धरल्याने जगभरात इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याची झळ हिंदुस्थानलाही बसत आहे.
कोविड काळात मागणी घटल्याने तेलाचे दर खाली आले होते, मात्र सध्याच्या परिस्थितीत मागणी कायम असताना पुरवठाच खंडित होणार आहे, असे मोहम्मद अल-जादान यांनी स्पष्ट केले.
इराणने मला ‘सर्वोच्च नेता’ बनवण्याची ऑफर दिली होती, पण…, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
दरम्यान, आगामी काळामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 150 डॉलर्सच्या पार जाऊ शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्याने लांबच्या मार्गाने आणि चढ्या दराने इंधनाची आयात करावी लागत आहे. वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. अनेक विकसनशील देशांना या धक्क्यातून सावरणे कठीण जाईल, ज्यामुळे जागतिक मंदीची लाट येऊ शकते.





























































