अन्न-पाण्यावाचून उपासमार, महिन्याभरात 10 हून अधिक माकडांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर

माळशिरस तालुक्यातील महाळूंग येथील यमाईदेवीच्या मंदिरातील दहाहून अधिक माकडांचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या विषयी पशु वैद्यकीय तंज्ञानी दिलेल्या अहवालानुसार माकडांचा मृत्यू हा दूषित पाणी आणि पुरेसे अन्न न मिळाल्याने झाल्याचे उघड झाले. या मुक्या प्राण्यांना जीवदान देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महाळूंग या छोट्याशा खेड्यामध्ये श्री यमाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. पुरातत्व विभागाच्या अधिपत्त्याखाली असलेल्या या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वीपासून माकडांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. देवीची माकडे म्हणून या माकडांची ओळख आहे. ही माकडे भाविकांनी दिलेले अन्न पदार्थ आणि या परिसरातील फळं झाडे यावर आपला उदरनिर्वाह करीत होती. मात्र बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे फळ झाडे कमी झाली आहेत. त्यात यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत. मंदिरासमोर असलेली विहीर कोरडी पडल्याने मिळेल तिथल्या अशुद्ध पाण्यावर माकडांना आपली तहान भागवावी लागत आहे.

देवीच्या या माकडांना पुरेसे सकस अन्न आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करुन जीवदान देणे गरजेचे आहे. यासाठी वन विभाग व प्राणीमित्र सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. महाळूंगच्या सरपंच उषाताई भोसले या शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.