
अमित खोत, मालवण
दोन महिने शांत असलेल्या शाळा शुक्रवारी पुन्हा गजबजल्या. नव्या (२०१८-१९) शैक्षणिक वर्षांचा ‘श्री गणेशा’ शुक्रवार १५ जून पासुन झाला आहे. मालवण तालुक्यातील २४६ शाळेत ७४७ विद्यार्थां पहिलीच्या वर्गात दाखल झाले आहेत. प्रत्येक शाळेत नवागतांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांनी दिली आहे. पण, मालवणातील शाळांतील १०८ शिक्षकपदे रिक्त असल्याचं समोर आलं आहे.
एकुणच मालवण तालुका शिक्षण विभागात जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांची १०८ पदे रिक्त आहेत. त्यात पहिलीच्या वर्गात मोठ्या संख्येने विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षणाचा विचार करता रिक्त जागी शिक्षक नियुक्तीचे मोठे आव्हान शिक्षण विभागसमोर असणार आहे. मालवण तालुका शिक्षण विभागात ५४ उपशिक्षक, ५४ पदवीधर तसेच ३ केंद्रप्रमुख व २ विस्तार अधिकारी अशी एकूण ११३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
मालवण तालुक्यात २०४ प्राथमिक व पूर्ण प्राथमिक, ३४ हायस्कूल व ८ खाजगी व इंग्लिश माध्यम अशा एकूण २४६ शाळा आहेत. या शाळेत शुक्रवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाला. शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मोफत पुस्तकांचेही वाटप करण्यात आले. पाहिली व आठवीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलला. त्याची पुस्तके गुरुवारी प्राप्त झाली. ती पुस्तके वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित सर्व वर्गांची पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. मंगळवार १९ जून पर्यंत १०० टक्के पुस्तके वितरित होतील असा विश्वास गटशिक्षणाधिकारी यांनी व्यक्त केला.
गणवेश मिळणार ‘लेट’
प्राथमिक शाळातील सर्व मुली तसेच अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व मुलां- मुलींना मोफत गणवेश शासनाच्या वतीने दिले जातात. गतवर्षी गणवेशाची रक्कम पालकांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र यावर्षी शासनाचे असे कोणतेही आदेश प्राप्त नाहीत. मात्र आदेश प्राप्त होताच रक्कम तात्काळ जमा केली जाईल, अशी माहिती तालुका शिक्षण विभागाने दिली आहे.































































