
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
राज्यातच नव्हे तर देशभरात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. त्यातच बुलढाणा जिल्हा हा अत्यंत मागास जिल्हा आहे. जिल्ह्यात कुठेही मोठमोठे उद्योग धंदे नाहीत. जिल्ह्यातील युवक-युवतींच्या हाताला काम नाही. जिल्ह्यात शेतकरीवर्ग मोठा आहे. मोठ्या कष्टाने शेतकर्यांनी मुलांना शिकवले. शिकवण्यासाठी शेती विकली. मुले शिकले परंतु हाताला काम नसल्याने सगळे गणितच हुकले. शेती नाही, गावात खेड्यात करायला काम नाही त्यामुळे बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आऽऽ वासून पुढे उभा आहे. भविष्यात हि बेरोजगारी अख्खी पिढी संपविणार असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाण्यात 45 कंपन्यांना आमंत्रित करुन भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करून 5 वी ते पदवीधर सहभागी 2 हजार 900 बेरोजगारांपैकी 796 बेरोजगारांना ‘ऑन दि स्पॉट ऑर्डर’ देवून रोजगारांची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला विजयराज शिंदे यांनी 796 बेरोजगारांना रोजगाराची एकप्रकारे भेट दिली आहे. बुलढाण्यातील राजे गार्डन येथे बेरोजगार मेळाव्याचे उद्घाटन बुलढाणा शहरातील युवा उद्योजक कमलेश कोठारी यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख उपस्थिती म्हणून रेखा व्यंकटेश बोरकर, वसंतराव जी. जवरे, सिनेस्टार विशाल कुलथे उपस्थित होते. यावेळी कमलेश कोठारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आता उदर निर्वाहासाठी नोकरी करा पण भविष्यात नोकरी देणारे उद्योजक बनण्याचा नवा मंत्र युवक युवतींना दिला. वसंतराव जवरे व रेखाताई बोरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर अर्पिताताई शिंदे उपस्थित होत्या.
आज सकाळ पासूनच पावसाचा जोर असतांना ही जवळपास 2900बेरोजगार युवक युवतीनी रोजगार मेळाव्यात उपस्थिती लावली होती. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, जालना या ठिकाणच्या जवळपास 45 कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते. त्यात प्रामुख्याने रिलायन्स एचआर सर्व्हिसेस, इन्फोसेस, संजय अटो, व्हेरॉक, मॅन्युफॅक्चरिंग, समर्थ जॉब्स प्रा.ली., नवकिसान बायो प्लांटेक प्रा.ली., नवभारत फर्टिलायझर, आयसीआयसीआय बँक पुणे, सिटी बँक, एलआयसी ऑफ इंडिया, ग्लोबल टायलेंट ट्रक, एमएमसी हार्डमेंटल प्रा. ली, सीओएम फिल्म प्रा ली आदी कंपन्यानी आपला सहभाग नोंदवला होता.
मेळाव्यातच एकूण 796 बेरोजगार युवक युवतींना नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले होते. यावेळी रोजगार प्राप्त झालेल्या शेकडो तरुण तरुणींनी विजयराज शिंदे यांचे आभार मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, केशवराव बाहेकर, वसंतराव जावरे, नगरसेविका सिंधुताई खेडेकर, अर्जुन दांडगे, पं.स. सदस्य कृष्णा भोरे, सागवन सरपंच राजगुरे हे मान्यवर उपस्थित होते. बहारदार सूत्रसंचालन रणजितसिंह राजपूत यांनी केले.






























































