
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत चिंचवड गावात साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक, वैचारिक-प्रबोधनपर व्याख्याने तसेच आरोग्य शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 460वे वर्ष आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून 50 टक्के नागरिकांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी शुक्रवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत दिली.
विश्वस्त विश्राम देव, ह.भ.प. आनंद तांबे, विनोद पवार, माजी महापौर अपर्णा डाके, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, गजानन चिंचवडे, महेश पाटसकर, अतुल भंडारे उपस्थित होते. महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंह स्वामी यांच्या हस्ते 21 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. महोत्सवानिमित्त 21 ते 25 डिसेंबरच्या कालावधीत रोज सकाळी 9 ते 11 या वेळेत श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सुक्त पठण होईल. भजन, किर्तन, सुगम संगीत, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, याग, श्रीसुक्त पठण, दंत आणि नेत्र चिकित्सा शिबिर, माफक दरात चष्मे वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.
22 डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता समाधी मंदिरामध्ये चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर सामूहिक अभिषेक, आरोग्य शिबिर होणार असून दुपारी बारा ते चार भजन सेवा होईल. सायंकाळी साडेचार वाजता आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान तर रात्री आठ वाजता वैशाली माडे व सहकलाकारांचे सुगम संगीत होणार आहे, 23 डिसेंबर रोजी सकाळी डॉ. सौरभ फळे यांचे दंत चिकित्सा आणि डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे आरोग्य तपासणी शिबिर होईल. सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे ‘हिंदवी स्वराज्याचे धार्मिक धोरण व श्री देवदर्शन’ या विषयावर व्याख्यान होईल, तर रात्री नऊ वाजता राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे व सहकलाकार यांचे गायन होणार आहे.
24 डिसेंबर रोजी सकाळी सोहम योग साधन, चरित्र पठण, याग होईल. सकाळी साडेनऊ ते पाच या वेळेत रक्तदान शिबिर होईल. दुपारी बारा वाजता भजन, सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत ह. भ. प. संदीप मांडके यांचे कीर्तन होईल. सायंकाळी साडेसहा वाजता पुरस्काराचे वितरण, रात्री आठ वाजता आर्या आंबेकर यांचे सुगम संगीत होईल. तर, 25 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव, चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी सात वाजता समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन होईल. रात्री दहा वाजता श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, श्री मंगगलमूर्ती वाडा येथे धुपारती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल.


























































