डास चावल्याने असह्य खाज येतेय ? त्वरीत करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

घर आणि घराच्या आजूबाजूच्या परिसरात घाण किंवा दुर्गंधीयुक्त पाणी साचले असेल तर त्यामध्ये डासांची पैदास होते. डास चावल्याने त्वचेला असह्य खाज येऊन त्वचा लाल होणे, सुजणे, पुरळ उठणे असे त्रास जाणवू लागतात. डास चावल्याने त्वचेला येणारी खाज कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करता येऊ शकतात. ज्यामुळे खाज, जळजळ, त्वचेवर उठलेले चट्टे नक्कीच कमी व्हायला मदत होईल.

त्वचेवरील ज्या भागात डास चावले आहेत तेथे बर्फ चोळा. यामुळे आराम मिळून डास चावलेल्या जागेवर डाग पडला असेल तर तो निघून जाईल.

डास चावलेल्या शरीराचा भाग पाण्याने ओला करा. त्यावर हलक्या हाताने मीठ चोळा. यामुळे लवकरच आराम मिळेल. खाजेमुळे उठलेले लाल चट्टे निघून जातील.

कडुलिंबाच्या तेलात औषधी गुणधर्म असतात. या तेलातील अँण्टीबॅक्टेरियल या गुणधर्मामुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी दूर व्हायला मदत होते. त्यामुळे डास चावलेल्या जागी कडुलिंबाचे तेल लावा.

लिंबाच्या रसातही अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. डास चावलेल्या जागी असह्य खाज येत असेल तर लिंबाचा रस चोळल्यास खाज कमी होऊन इन्फेक्शन होण्यापासून रक्षण होईल.

सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये मॉलिक अॅसिड असते. ज्यामुळे खाज आणि जळजळ होण्यापासून आराम मिळतो. डास चावलेल्या जागी कापसाच्या बोळ्याने सफरचंदाचे व्हिनेगर लावले तर खाजेपासून आराम मिळतो.

कोरफडाचे जेल डास चावलेल्या जागी लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळून जळजळ थांबते.

बेकिंग सोड्यामध्ये अल्कधर्मी तत्त्व असते. ज्यामुळे त्वचेवमधील पीएच घटकाचे रक्षण होते. बेकिंग सोड्यामध्ये पाण्याचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण डास चावल्यामुळे खाज येत असलेल्या जागी लावा.