दसऱ्याचे धुने धुन्यासाठी गेलेल्या मायलेकाचा तलावात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

दसऱ्याचे धुने धुन्यासाठी गेलेल्या माय लेकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धारूर तालुक्यातील कासारी येथे रविवारी दुपारी घडली असून मायलेकराच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कासारी गावापासून पाचशे मीटर अंतरावर हरणमारी गाव तलाव आहे. मागील आठवडयात झालेल्या पावसाने या तलावातील पाणी वाढले होते. तलावात बऱ्यापैकी पाणी असल्याने दसरा उत्सवानिमित्त कपडे धुण्यासाठी मागील चार दिवसापासून येथे महिलांची गर्दी होत होती. शीतल कल्यान बडे वय 37 या आपल्या दोन मुलांसह तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असताना त्यांची दोन्ही मुले बाजूला खेळत होती. त्याचवेळी त्यांचा लहान मुलगा प्रतीक कल्यान बडे वय 10 हा पाय घसरून पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी मोठा मुलगा ओमकार कल्यान बडे वय 14 व आई शीतल यांनी पाण्यात उडी मारली. पोहता येत नसल्याने ते तिघेही बुडू लागले. दरम्यान कपडे धुवायला आलेल्या काही बायकांनी प्रतीकला पाण्यातून बाहेर काढले. मात्र ओमकार व शीतल यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा दिंद्रूड पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढले.