मोटरसायकल चोरुन दुकाने फोडणारे दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटरसायकलची चोरी करून रत्नागिरी शहरातील पाच दुकाने फोडणाऱ्या दोन चोरट्यांच्या रत्नागिरी शहर पोलिसांनी वाहनांची तपासणी करत असताना मुसक्या आवळल्या. दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत मोटरसायकल चोरी करून दुसऱ्या दिवशी त्या दोन चोरट्यांनी रत्नागिरी शहरातील दुकाने फोडली होती.

पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरु केली. लाला कॉम्पलेक्स जवळ वाहने तपासत असताना पोलिसांना दोन व्यक्ती संशयितरित्या आढळून आल्या. त्या व्यक्तींकडे असलेली मोटरसायकल ही रत्नागिरी शहरातून चोरीला गेलेली मोटर सायकल असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी ठाकूर धनसिंग भूरिया (35, रा.राजनगर, तालुका कुक्शी, जिल्हा धार, मध्यप्रदेश) आणि रायचंद फत्तू ओसनिया (24, रा.मंगलदा, तालुका कुक्शी, जिल्हा धार मध्यप्रदेश) अशी त्यांनी नावे सांगितली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी पाच ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील चार मोटरसायकल, एक मोबाईल, दोन मनगटी घड्याळे, पाच सिल्वर कॉईन जप्त केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि त्यांच्या पथकाने केली.