
सामना ऑनलाईन। भोपाळ
मध्यप्रदेश मधील इंदूर येथे आयकर विभागात काम करणाऱ्या एका आयटी अधिकाऱ्याने सापाचे प्राण वाचवून माणुसकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. शेरसिंह गिन्नारे असे त्याचे नाव असून विषप्रयोगामुळे बेशुद्ध झालेल्या सापाच्या तोंडात स्ट्रॉने पाणी टाकून त्यांनी त्याचे प्राण वाचवले आहेत.
येथील झलरिया गावातील बिर्लॉ शाळेत शनिवारी काहीजणांना भलामोठा साप आढळला. सापाला बघताच हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी जीवाच्या भीतीने त्याच्या अंगावर किटकनाशकांवर फवारतात तो स्प्रे ओतला. त्यात विषारी द्रव्य असल्याने साप काही वेळातच बेशुद्ध झाला. त्याचवेळी ग्रामस्थांपैकी एकाने तो विषारी साप नसल्याचा दावा करत तुम्ही गरीब प्राण्याला मारलंत असा आरोप केला. साप विषारी नव्हता हे कळताच त्याच्यावर स्प्रे मारणाऱ्यांना वाईट वाटले. त्यांनी लगेचच आयटी अधिकारी व प्राणीमित्र असलेल्या शेरसिंह गिन्नारे यांना बोलावले. गिन्नारे यांनी सापाला बघताच तो विषारी नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तोंडात पाणी घेऊन ते स्ट्रॉच्या मदतीने सापाच्या तोंडात टाकले. यामुळे सापाला शुद्ध आली व त्याला उलटीही झाली. उलटी केल्यामुळे त्याच्या पोटात गेलेले विषारी द्रव्यही बाहेर पडले व साप पूर्ण शुद्धीत आला. त्यानंतर गिन्नारे यांनी सापाला जंगलात सोडले.

























































