
मध्य प्रदेशातील खरगोन येथे एका तरुणाने उधार घेतलेले 12 हजार रुपये परत केले नाही. यामुळे गुंडाच्या एका टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली व त्याच्या गुप्तांगात मिरची पूड टाकल्याची संतापजनक घटना घडली आहे. शोएब खान असे या पीडित तरुणाचे नाव असून भुरू असे मुख्य आरोपीचे नाव आहे. ही घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली आहे.
कासरवाड येथे राहणाऱ्या शोएबने भुरू नावाच्या एका मित्राकडून 12 हजार रुपये उधार घेतले होते. पण दिलेल्या मुदतीत तो पैसे परत करू शकला नाही. यामुळे भुरुने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. यावर पैसे आल्यावर लगेच परत करणार असे शोएबने सांगितले. पण भुरुला शोएबच्या शब्दावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्याने त्याला धमक्या देणे सुरुच ठेवले. शनिवारी शोएब घरी जात असता तो एकटाच असल्याचे बघून भुरू व त्याच्या गुंडमित्रांनी त्याला बेदम मारहाण केली. यावेळी मदतीसाठी शोएबने आरडाओरडा केला. पण कोणीही त्याच्या मदतीस आले नाही. उलट मारहाणीच्या या घटनेचा व्हिडीओ काढण्यात अनेकजण दंग होते. शेवटी मारहाणीत अर्धवट बेशुद्ध झालेल्या शोएबच्या गुप्तांगात या टोळक्याने मिरची पूड टाकली व तिथून पळ काढला. पोलिसांना याबद्दल कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व शोएबला रुग्णालयात दाखल केले.


























































