भाजपच्या मंत्र्यांना तालुक्यात फिरु देऊ नका- खासदार  राजीव सातव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

जिल्ह्यातील केवळ वसमत, औंढा हे तालुके सूडबुद्धीने दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले असून, जो पर्यंत या दोन तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत होत नाही तोपर्यंत भाजप मंत्र्यांना गाव बंदी करण्याचे आवाहन खासदार राजीव सातव यांनी आंदोलनास उपस्थित शेतकर्‍यांना केले. तसेच हिंगोली लोकसभा मतदार संघातील उर्वरीत सर्वच तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणीही सातव यांनी केली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉईंटवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको दरम्यान जिंतूर-औंढा, परभणी-औंढा राज्य रस्त्यावर तीन तास वाहतुक सेवा ठप्प झाली होती. संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या भीषण छायेत असतांना चुकीचे निकष लावून औंढा नागनाथ व वसमत ही दोन तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यामुळे या तालुक्यांचा यादीत समावेश करावा या सह हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्यावी, कमी दाबाने विजपुरवठा होत असुन सुरळीत विजपुरवठा करावा, विद्युत रोहित्र शेतकर्‍यांना तातडीने उपलब्ध करून द्यावेत, वंचित शेतकर्‍यांना पिकविम्याची रक्‍कम द्यावी यासारख्या विविध प्रश्नांवर शासनाला जाब विचारण्यासाठी खासदार राजीव सातव यांच्या नेतृत्वात जिंतूर टीपॉइंट वर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी कळमनुरीचे आमदार डॉ संतोष टारफे,  अब्दुल हाफीज, हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी दादासाहेब मुंडे,  संजय बोढारे, मुनिर पटेल, राजू पाटील नवघरे आदींची उपस्थिती होती. सकाळी 11:30 च्या दरम्यान रास्तारोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या रास्तारोको मुळे हिंगोली, नांदेड, परभणी, संभाजीनगर कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.