
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मध्यप्रदेशमध्ये यावर्षाअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय कुंभमेळा रंगणार आहे. भाजप सरकारने मध्य प्रदेशमध्ये पाच बाबांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला आहे . यानंतर येथील अनेक बाबांना मंत्री बनण्याचे वेध लागले आहेत. डिसेंबरमध्ये राजकारणाच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक साधुसंत प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
शिष्यांमध्ये कॉम्प्युटर बाबा नावाने ओळखले जाणारे स्वामी मानदेव त्यागी यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यासाठी भाजपावर दबाव आणणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. जर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मला विधानसभा निवडणूका लढवण्यास सांगितले. तर मी इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटल आहे. तर दुसरीकडे इंदूर मधून निवडणूक लढवता यावी यासाठी त्यागी प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले आहे.
कॉम्प्युटर बाबांनी नर्मदा नदी किनाऱ्यावरील वृक्षावरोपणातील कथित घोटाळ्यावर खुलासा करण्याबरोबरच बेकायदेशीर वाळू उत्खन्ननावर बंदी घालण्यासाठी एप्रिल महिन्यात ‘नर्मदा घोटाळा रथ यात्रा’ काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने एप्रिल महिन्यात ५ बाबांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. त्यात बाबांचाही समावेश होता. राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर बाबांनी घोषित यात्रा रद्द केली होती. राज्य सरकारने नर्मदा नदीच्या सुरक्षिततेसाठी साधुसंताच्या कमिटीची मागणी मान्य केल्याने आपण यात्रा रदद् केल्याचे त्यांनी सांगितले होते.
तर संत मदन मोहन खडेश्वरी महाराज सिवनी जिल्हयातील केवलारी विधानसभा मतदारसंघातून भाजपसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. माझा विजय निश्चित असून जर भाजपने तिकीट नाही दिले तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार. गेल्या ३० वर्षांपासून मी येथील लोकांसाठी काम करत आहे. तर रायसेन जिल्हयातील संत रविनाथ महीवाले यांनी देखील विधानसभा निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मी नर्मदा वाचवण्यासाठी निवडणूक लढवणार. जर भाजपकडून तिकीट मिळाले नाही तर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास मी तयार आहे. असे ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे बाबा महेंद्र प्रताप गिरी रायसेन यांनी भाजपकडे तिकट मागणार असल्याचे सांगितले आहे. तसेच भाजपकडून तिकीट मिळाले नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असेही त्यांनी म्हटले आहे.
मध्यप्रदेश मधील भाजप सरकारने या वर्षी पाच बाबांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. ज्यात नर्मदानंद महाराज, हरिहरनंद महाराज,कम्प्युटर बाबा, भय्यूजी महाराज आणि पंडीत योगेंद्र महंत यांचा समावेश आहे. यातील भय्यूजी महाराज यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.
summary -mp-sadhus-want-election-ticket




























































