उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित! मोदी, शहांच्या उपस्थितीत होणार सोहळा

4668
udayanraje-bhosale

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे्. आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील कमळ हाती घेण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. परंतु आता त्यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले शनिवारी 14 सप्टेंबरला दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. तसेच रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेत ते सहभागी होण्याचीही शक्यता आहे.

शरद पवारांची घेतली भेट
गुरुवारी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी भाजप प्रवेशाबाबत माहिती दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मनधरणीमध्ये लागलेल्या राष्ट्रवादीला तगडा धक्का बसला आहे.

राजू शेट्टींकडून मनधरणी
खासदार अमोल कोल्हे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी उदयनराजे भोसले यांची मनधरणी केली होती. आपण शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे आणि संसदेत आवाज उठवावा, असे आवाहन शेट्टी यांनी उदयनराजे यांना केले. तसेच सध्या राज्याची राजकीय परिस्थिती ठीक नाही. विरोधी पक्ष सक्षम असणे आवश्यक असल्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करू नका, अशी विनंती राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांना केली होती.

अमोल कोल्हे यांनी घेतली होती भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उदयनराजे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना कोल्हे यांनी, ‘मावळा राजाचे मन वळवू शकत नाही’, असे विधान केले. त्यामुळे कोल्हे यांच्याकडून उदयनराजे यांच्या मनधरणीचा प्रयत्न निष्फळ झाल्याचे दिसून आले.

आपली प्रतिक्रिया द्या