मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर एमपीएससीचा कटऑफ घसरला, आर्थिकदृष्टय़ा मागास उमेदवारांच्या संधीत वाढ

हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठय़ांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसीतून आरक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालाचे अवलोकन केले असता, मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर एमपीएससीचा कटऑफ घसरल्याचे दिसून येत आहे. तर आर्थिकदृष्टय़ा मागास (ईडब्ल्यूएस) कोटय़ातील उमेदवारांच्या संधीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामध्ये ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गाचे मेरीट 507 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. एसईबीसी म्हणजेच मराठा समाजाच्या उमेदवारांसाठीची मेरीट 490.75 आहे. ओबीसी उमेदवारांची मेरीट 485.50 आहे. त्या तुलनेत ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठीची मेरीट 445.00 आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नव्या जीआरनंतर ईडब्ल्यूएस प्रवर्गात असणारी लोकसंख्या व जातीचा विचार करता या कोटय़ातून आरक्षणाचा लाभ घेणाऱया उमेदवारांसाठी इतरांच्या तुलनेत कमी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य या ट्विटर हँडलवर यासंदर्भातील माहिती शेअर करण्यात आली आहे.

ओबीसीमध्ये मोठी स्पर्धा

मराठा आरक्षणासंदर्भातील नव्या जीआरमुळे कुणबी प्रमाणपत्र मिळवून बहुसंख्य मराठा उमेदवारांचा समावेश ओबीसीमध्ये होणार आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. खुल्या प्रवर्गापेक्षा ओबीसीचे मेरीट अधिक लागण्याची शक्यता आहे. एससी, एसटी, व्हीजेएनटी प्रवर्गासारखी ओबीसीमध्ये स्पर्धा असण्याची शक्यता आहे.

ईडब्ल्यूएस कोटय़ातून मराठा समाज बाहेर

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नव्या जीआरमुळे मराठा समाजातील उमेदवारांना सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश यासाठी ओबीसी आरक्षण किंवा एसईबीसी प्रवर्गातून 10 टक्के असे दोन पर्याय खुले झाले आहेत. एसईबीसी आरक्षणानंतर मराठा समाज ईडब्ल्यूएस कोटय़ातून आपसूचक बाहेर पडला आहे.