महाराष्ट्रात एमपीएससीचे आंदोलन चिघळले; पुण्यात दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांवर गुन्हे, रोहित पवारांची पोलीस ठाण्यात धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले आंदोलन पुणे पोलिसांच्या दडपशाहीमुळे चिघळले आहे. शुक्रवारी 15 विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आज आणखी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आज विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले आणि ‘विद्यार्थ्यांवर कशाला, माझ्यावर गुन्हा दाखल करा. पुणे सीपींचे डोके ठिकाणावर आहे का,’ असा संतप्त सवाल केला.

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 1 ऑक्टोबरपासून एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती देऊनही नवी पेठेतील लालबहादूर शास्त्र्ााr रस्त्यावर आंदोलन सुरू ठेवल्याप्रकरणी शुक्रवारी विद्यार्थी प्रतिनिधींसह 15 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेत विश्रामबाग पोलीस ठाण्यात धडक दिली. ‘माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांवर कशाला गुन्हे दाखल करता, माझ्यावर करा,’ अशी मागणी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.

पोलिसांनी इतक्याही लाजा विकू नये

‘पोलिसांनी इतक्याही लाजा विकू नये, मुख्यमंत्री महोदय, आपल्या विभागातील बिनडोक अशा पोलिसांवर कारवाई करावी, गोरगरीब शेतकऱयांच्या विद्यार्थ्यांना दहशतवादी आणि गुप्तहेर ठरवलं जातंय,’ असे रोहित पवार यांनी एका पीजी सेंटरला आलेल्या नोटिसीसंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करताना म्हटलं आहे. ‘एमपीएससी विद्यार्थ्यांवर काल गुन्हा दाखल झालेला होता. मात्र, त्यामध्ये रोहित पवारांचं नाव नव्हतं आणि त्यामुळे आता रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी ज्याप्रकारे विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला, त्याप्रकारेच माझ्यावरही गुन्हा दाखल करा,’ अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

‘पुणे सीपी साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? महाराष्ट्राचं उद्याचं भविष्य असलेल्या तरुणांना आतंकवादी, दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणणाऱया पुणे पोलिसांचा जाहीर निषेध! इतक्याही लाजा विकू नका..! मुख्यंत्र्यांनी आपल्या विभागातील बिनडोक अधिकाऱयांना थोडी समज द्यावी. भ्रष्ट मित्रासाठी गोरगरीब युवा पिढीला कशाला बदनाम करता?’ असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.