एमआरआयडीसी बांधणार रेल्वेचे चार उड्डाणपूल

16

सामना प्रतिनिधी, मुंबई

अंधेरीतील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या पुलांच्या हद्दीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ग्रॅण्ट रोड स्थानकातील फेरारे, दादर स्थानकातील टिळक पुलासह एकूण चार उड्डाणपुलांची बांधणी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन करणार आहे. त्यासाठी रेल्वे व मुंबई पालिकेकडून निधीही उपलब्ध केला जाईल. या कामाची तयारी म्हणून या पुलांवरून टाकण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या युटीलिटी केबल्स काढण्याच्या सूचना संबंधितांना केल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलांच्या सुरक्षेबाबत ऑडिट करण्यात आले होते. त्यानंतर लोअर परळ येथील उड्डाणपुलाला धोकादायक ठरवण्यात आल्याने त्याला पाडण्यात आले. आता इतर ब्रिटिशकालीन उड्डाणपुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. ग्रॅण्ट रोड स्थानकातील फेरारे पूल, मुंबई सेंट्रलमधील बेलासीस, दादर येथील टिळक पूल व महालक्ष्मी स्थानक पुलांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. या पुलाचे पाडकाम करण्यापूर्वी त्यावरील रहदारीचे नियोजन करण्यासाठी सल्लागारही नेमण्यात आला आहे. त्यानंतर या चार उड्डाणपुलांची जबाबदारी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला देण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

पूल गंजू नये म्हणून टय़ुबलर डिझाईनचा वापर
ब्रिटिशकालीन पूल अजूनही मजबूत असले तरी 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या पुलांची पुनर्बांधणी करणे गरजेचे असून ते नव्याने बांधताना त्याच्यावर पाणी थांबणार नाही असे त्याचे डिझाईन तयार करण्यात येणार असून स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात येणार आहे. बॉक्स टाईप डिझाईनमुळे पाणी मुरण्यास वाव असतो आणि लोखंड गंजायला सुरुवात होते. त्यामुळे नव्या डिझाईनमध्ये टय़ुबलर डिझाईनचा वापर करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर 136 पादचारी पूल
गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेवरील 13 पादचारी पूल बंद करण्यात आले होते, तर काही उड्डाणपुलांवरील पादचारी मार्गिकाही पादचाऱयांसाठी बंद केल्या. त्यानंतर काही नवीन पादचारी पुलांची बांधणी व जुन्या पुलांची दुरुस्ती कामे हाती घेतली व ते सेवेत आले. आता 17 पादचारी पूल मार्च 2020पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येतील. गेल्या वर्षी 24 पादचारी पूल बांधले होते. यंदा 20 ते 22 पादचारी पूल बांधले जातील. एकूण 136 पादचारी पूल बांधले जाणार असून त्यातील 84 पादचारी पूल नव्या जागांवर बांधणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या