वास्तवावर अचूक बोट ठेवणाऱ्या कथांचा संग्रह  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लेखिका मृद्गंधा दीक्षित यांचा ‘डोक्यावर पडलेल्या गोष्टी’ हा दुसरा कथासंग्रह. सुप्त मनातील वास्तवावर अचूक बोट ठेवणाऱ्या कथांचा हा संग्रह वॉल्डन पब्लिकेशनतर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. मनातील दोलायमान विचारांना कोणतीच मर्यादा नसते. मुक्त विचारांचे हे दृश्यरूप कथेच्या माध्यमातून या संग्रहात आपल्या समोर येते. या कथासंग्रहाला लेखिका डॉ. अंजली जोशी यांची मर्मग्राही प्रस्तावना लाभली असून पुस्तकाचे गूढ वाटावे असे मुखपृष्ठ सुभाष अवचट यांनी साकारले आहे. रोजच्या जगण्यात अचानक डोकावणारे भन्नाट, प्रसंगी विकृत विचार आपण सहसा मागे ढकलून पुढे जातो. पण, तसं न करता त्या विचारांचाच पाठलाग केला तर? ‘डोक्यावर पडलेल्या गोष्टी’ हा मानवी मनाच्या अस्वस्थ, गूढ आणि अंधाऱ्या कोपऱ्यात केलेला धाडसी प्रवासच. सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या, पण आतून एकाकीपणा आणि मानसिक संघर्षाच्या दुष्टपात अडकलेल्या स्त्रियांच्या या कथा आहेत. मनातील अनाहूत भीती, शरीराच्या कुरवाळाव्याशा वाटणाऱ्या जखमा, अतरंगी धारणा आणि आपणच काळजीपूर्वक दाबून ठेवलेल्या विकृती यांच्याविषयीच्या कुतूहलातून या कथा जन्माल्या आल्या आहेत.