महावितरणच्या उपकेंद्र सहाय्यक भरतीची सीआयडी चौकशी करा, वीज कामगार संघटनांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महावितरणने उपकेंद्र सहाय्यकांच्या 2223 पदांच्या भरतीसाठी जून 2019 मध्ये जाहिरात काढली होती. त्यानुसार प्रशासनाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. जाहिरातीत आयटीआय इलेक्ट्रीकल ही प्रमुख अट होती. तसेच ज्या उमेदवारांनी दोन वर्षांचा शिकाऊ कालावधी पूर्ण केला आहे, तो अनुभव म्हणून गुणवत्ता यादी लावताना विचारात घेतला जाईल असे नमूद केले होते. मात्र प्रत्यक्ष गुणवत्ता यादी जाहीर करताना प्रशासनाने केवळ उमेदवारांना दहावीमध्ये मिळालेले गुण विचारात घेतले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाला असल्याने या भरतीची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी वीज कामगार संघटनांनी केली आहे.

उपकेंद्र सहाय्यक पदांच्या जागेसाठी आयटीआय इलेक्ट्रिकलची अट होती. तसेच शिकाऊ उमेदवारांनी दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला आहे, तो दोन वर्षे अनुभव म्हणून गुणवत्ता यादी बनवताना ग्राह्य धरले जाईल असे जाहिरातीत नमूद केले होते. मात्र त्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. तसेच उमेदवारांची प्रत्यक्ष कामाविषयी ट्रेड टेस्ट न घेता गुणवत्ता यादी लावली आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेत किती गुण मिळाले आहेत तेही जाहीर केले नाहीत. त्यामुळे या सर्व भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.