राज्यभरात 2375 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभे राहणार, वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पार्श्वभूमीवर महावितरणचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात विजेवरील वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना सहजपणे आपले वाहन चार्ज करता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणने राज्यभरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2375 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून विजेवर चालणाऱया इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहेत. 2030 पर्यंत देशात विकल्या जाणाऱया एकूण वाहनांपैकी 30 टक्के इलेक्ट्रिक वाहने असणार आहेत. या वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सहज उपलब्ध व्हावी महावितरणने राज्यात 13 ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू केली आहेत. याशिवाय राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत 2025 पर्यंत राज्यातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधांतर्गत 2375 चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यामध्ये मुंबई-1500, पुणे शहर-500, नागपूर शहर-150, नाशिक शहर-100, संभाजीनगर -75, अमरावती-30, सोलापूर -20 एवढी चार्जिंग स्टेशन असणार आहेत.

49 चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतिपथावर

महावितरणकडून सध्या 49 इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यात नवी मुंबई-10, ठाणे-6, नाशिक-2, संभाजीनगर -2, पुणे- 17, सोलापूर – 2, नागपूर – 6, कोल्हापूर – 2, अमरावती – 2 अशी आहेत.
महामार्गांवरही चार्जिंग सुविधा

– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे हे पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहे.

– एखाद्या खासगी व्यक्तीला किंवा संस्थेला चार्जिंग स्टेशन उभारायचे असेल तर त्यांना महावितरणकडून प्राधान्याने वीज पुरवठा करण्यात येत आहे.