
एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी मिळावी म्हणून त्यांना सोमवारपर्यंत डय़ुटीवर हजर झाल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आज निलंबित कर्मचाऱ्यांपैकी 149 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले. त्यामुळे सोमवारी एकूण हजर कर्मचाऱ्यांची संख्या 21,370 इतकी झाली आहे.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने सायं. 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 2639 बसेसच्या फेऱ्यांद्वारे वाहतूक चालू ठेवत ग्रामीण भागातील जनता आणि शालेय विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबरपासून संप सुरू केला असून तो अजूनही सुरूच आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरणाची मागणी कायम आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ झाली आहे. त्यांना दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत पगाराची हमी सरकारने दिली आहे. औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदा ठरवला आहे. त्यामुळे आतापर्यंत दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु अनेक कर्मचारी कामावर परतू इच्छीत असल्याने त्यांना एक संधी मिळावी म्हणून सोमवारपर्यंत हजर झाल्यास निलंबन रद्दबातल करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते.
आज निलंबित करण्यात आलेल्यांपैकी 149 कर्मचारी कामावर हजर झाले असून व इतर कर्मचारी असे मिळून एकूण 339 कर्मचारी आज कामावर हजर झाले आहेत. एकूण 21,370 कर्मचारी कामावर आले आहेत. राज्यातील 250पैकी 125 आगारातील वाहतूक अंशतः चालू करण्यात यश आले असून सायं. 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार विविध मार्गांवर 2639 फेऱ्यांद्वारे वाहतूक चालविण्यात यश आले आहे.




























































