काही लोक पोटापाण्यासाठी करतात वायफळ बडबड; भाजपचा ओवैसींवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

या देशावर आमचा बरोबरीचा हक्क आहे, आम्ही इथले भाडेकरू नाही असे विधान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी केले आहे. ओवैसी यांच्या या विधानावर भाजपने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. काही लोक पोटापाण्यासाठी आणि स्वार्थासाठी निरुपयोगी बडबड करतात, असा प्रतिहल्ला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी ओवैसी यांच्यावर केला आहे. देशातील 130 कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे आणि मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे. त्यामुळे अशी निरुपयोगी बडबड करणाऱ्यांकडे जनता लक्ष देणार नाही, असेही नकवी म्हणाले.

एका सभेत शनिवारी ओवैसी म्हणाले की, ज्यांना वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना 303 जागा मिळाल्या आहेत तर ते मनमानी कारभार करू शकतात, ते आम्ही होऊ देणार नाही. संविधानाचा हवाला देऊन मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, असदुद्दिन ओवैसी तुमच्याशी लढणार आहे. आम्ही देशाला पुढे नेऊ, देशाचा विकास करू. इथे आमचा समान हक्क आहे. इथे आम्ही भाडेकरू नसून आम्ही हिस्सेदार आहोत, असेही ओवैसी म्हणाले. मोदींची सत्ता आल्याने देशातील मुस्लीमांनी घाबरून जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरांतून टीका होत होती.

ओवैसी यांच्या या विधानावर भाजपनेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशात शांततेचे वातावरण असताना काही लोक स्वार्थासाठी आणि पोटापाण्यासाठी अशी निरुपयोगी बडबड करतात. त्याचा कोणालाच फायदा होत नाही. जाती- धर्म आणि क्षेत्रीय सलोखा बिघडवून स्वार्थ साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, जनता आता अशा लोकांना थारा देणार नाही. देशातील 130 कोटी नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या हातात देश सुरक्षित आहे. त्यामुळे वायफळ बडबड करून देशातील सलोख बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असा सल्लाही नकवी यांनी ओवैसी यांना दिला आहे.