मुलुंडच्या बायो-मायनिंग प्रकल्पात 4.81 दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, साडेसहा वर्षांत 68 टक्के कचऱ्याची विल्हेवाट

मुंबईतील विविध भागांतून मुलुंड क्षेपणभूमी येथे आणल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. कचऱ्यातील माती, ज्वलनशील पदार्थ तसेच राडारोडा किंवा दगडासारख्या घटकांचे वर्गीकरण करून त्यावर या ठिकाणी प्रक्रिया केली जाते. ऑक्टोबर 2019 पासून हा प्रकल्प कार्यरत असून या ठिकाणी आतापर्यंत 4.81 दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे 68.77 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

मुलुंड क्षेपणभूमी येथील बायो-मायनिंग प्रकल्पाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली.

मुलुंड क्षेपणभूमीवरील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून मूळ जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील सुमारे सात दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मायनिंग प्रकल्प राबवला जात आहे. गगराणी यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामग्री तसेच प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी उपायुक्त किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.