कॅन्सर पीडित मुलाच्या उपचाराचे पैसे आईने जुगारात उडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

जन्मदात्या आईने कॅन्सरग्रस्त मुलाच्या उपचारासाठी लोकांनी दिलेले पैसे जुगारावर उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंग्लंडमधील लीड्स येथील ही घटना असून स्टेली वर्सली (32) असे या महिलेचे नाव आहे. तर टोबी (6) असे तिच्या मुलाचे नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी 2017 साली टोबीला दुर्मिळ कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यावरील उपचारासाठी 2 कोटी रुपयांची गरज असल्याने अनेक दानशूर व्यक्ती टोबीच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या होत्या. त्यामुळे अपेक्षेहून अधिक पैसे स्टेलीच्या खात्यात जमा झाले. त्यातील 93 लाख रुपये तिने जुगारावर उडवले. याचदरम्यान उपचार सुरू असतानाच टोबीचा मृत्यू झाला. त्यानंतर स्टेली विरोधात एकाने न्यायालयात खटला दाखल केला होता. तिने मुलाच्या उपचारासाठी जमवलेले पैसे जुगारात उडवल्याचा तिच्यावर आरोप होता. अखेर स्टेलीने पैसे जुगारात खर्च केल्याची कबुली दिली. पण मिळालेल्या पैशांपैकी थोडीच रक्कम जुगारात खर्च केल्याची तिने न्यायालयात कबुली दिली. त्यानंतर न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. 29 मार्चला या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे.