मुंबादेवीचा आशीर्वाद शिवसेनेला!

1317

मुंबईची ग्रामदेवता असलेल्या माता मुंबादेवीच्या नावाच्या ‘मुंबादेवी’ मतदारसंघात यावेळी जनमताचा कौल महायुतीच्या बाजूने पडणार असेच चित्र आहे. महायुतीचे उमेदवार पांडुरंग सकपाळ आणि काँगेसचे विद्यमान आमदार  अमीन पटेल यांच्यात खरी लढत आहे. याआधी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अमीन पटेल यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, तर शिवसेनेचे विभागप्रमुख असलेल्या पांडुरंग सकपाळ यांचा दांडगा जनसंपर्क त्यांचे विजयाचे गणित सोपे करणार आहे.

2009च्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना होऊन मुंबादेवी मतदारसंघाचा विस्तार झाला. डोंगरी, सॅण्डहर्स्ट रोडसारखा बराचसा मुस्लिम भाग या मतदारसंघात आला. त्यामुळे मुंबादेवी हा मुस्लिमबहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्याच खालोखाल जैन, गुजराती, मराठी आणि तेलुगू समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे या मतदारसंघातून विजयी होण्यासाठी अमराठी मते खूप महत्त्वाची ठरतात.

संमिश्र लोकवस्तीच्या मुंबादेवी मतदारसंघात अरुंद गल्ल्या, काही महत्त्वाच्या व्यापार पेठा, टोलेजंग नव्या इमारतींबरोबर जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारती, चाळी, फुटपाथवरील अतिक्रमणे, अनधिकृत झोपडपट्ट्या, प्रचंड रहदारीच्या तुलनेत अरुंद, चालायला जागाही नसलेले रस्ते, पदपथ यामुळे रहिवासी आणि व्यापारी वर्ग वर्षानुवर्षे त्रस्त आहेत. काँग्रसचे अमीन पटेल यांच्या कार्यकाळात या समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी दिसत आहे.

गोल देऊळ, कुंभारवाडा, कामाठीपुरा, मुंबई सेंट्रल- बीआयटी,  रिलायन्स टॉवर, बाळाराम स्ट्रीट, डोंगरी, उमरखाडी, चिंचबंदर हे भाग म्हणजे शिवसेनेचे ‘पॉकेट्स’ मानले जातात. तिथे शिवसेनेचे हक्काचे मतदार आहेत. याशिवाय जैन मारवाडी संघ, कामाठीपुरा येथील तेलुगू समाज यांचा महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा आहे. मुस्लिम मोहल्ल्यांतून महायुतीचे चांगले स्वागत होताना दिसत आहे.

प्रमुख समस्या

  • मुंबादेवी मतदारसंघात जुन्या इमारती जास्त आहेत. या मतदारसंघात इमारती पडण्याच्या आणि रहिवासी मृत्युमुखी पडण्याच्या सर्वाधिक दुर्घटना घडलेल्या आहेत. इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे.
  • रस्ते खराब, गटारांची समस्या मोठी आहे.
  • रहिवाशांना कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा या समस्या भेडसावत आहेत.
  • वाहतुकीचा बोजवारा तर नेहमीचाच आहे.

8 मुस्लिम तर 3 मराठी उमेदवार

मुंबादेवी मतदारसंघात आठ मुस्लिम तर तीन मराठी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शमशेरखान पठाण, एआयएमआयएमचे बशीर मुसा पटेल, मनसेचे केशव मुळे, अपक्ष निवृत्त उदय शिरूरकर यांचा समावेश आहे. मात्र थेट लढत शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ आणि काँग्रेसचे अमीन पटेल यांच्यातच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या