मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी 12 आरोपींची निर्दोष मुक्तता, पाच जणांची फाशी रद्द

मुंबईत 11 जुलै 2006 ला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यातील 5 जणांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती तर बाकीच्या सात जणांना जन्मठेप सुनावण्यात आलेली. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाईमबॉम्ब ठेवत मुंबई लोकलमध्ये 11 मिनिटांत 7 बॉम्बस्फोट घडवले होते. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने 13 पैकी 5 आरोपींना फाशीची व उर्वरितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान, आसिफ खान यांना फाशी तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांना जन्मठेपेची शिक्षा मोक्का न्यायालयाने ठोठावली होती.